हिंजवडी : आयटी नगरी हिंजवडीचे विद्यमान सरपंच गणेश जांभुळकर यांनी शैक्षणिक दातृत्वाचे पुणे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. जांभुळकर यांनी स्वतःच्या स्वखर्चातून वीस सायकली विद्यार्थ्यांना भेट देत दातृत्वाचा आदर्श उभा केला आहे.
मुळशी तालुक्यातील दुर्गम भागांतील व वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहतुकीची योग्य सोय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास कठीण बनला होता. हीच परिस्थिती लक्षात घेऊन मुळशीचे बिडीओ सुधीर भागवत यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायकलींची आवश्यकता असल्याचे आवाहन केले होते.
या सामाजिक आवाहनाला मनापासून प्रतिसाद देत सायकल भेट दिल्या आहेत. या सायकलींचे वितरण मुळशीचे बीडीओ सुधीर भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशाल साखरे, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन आबा जांभूळकर, ग्रामविकास अधिकारी सोमा खैरे, युवा नेते सूरज जांभूळकर, संतोष साखरे, उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना सरपंच मा. जांभुळकर म्हणाले, शिक्षण हेच खरे साधन आहे जे प्रत्येक घर उजळवते. मुलं शाळेत जाण्यासाठी अडचणीत पडू नयेत, यासाठी आपण सर्वांनी आपापल्या परीने हातभार लावला पाहिजे. सायकल देणे म्हणजे फक्त वाहन देणे नाही, तर त्यांच्या भविष्याच्या प्रवासाला गती देणे आहे.
या सायकलींमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आता नवचैतन्य निर्माण मिळणार आहे. ग्रामीण भागात संवेदनशीलतेने उभं राहून काम करण्याचं उदाहरण म्हणजेच गणेश जांभुळकर यांचा हा उपक्रम. गावातील शिक्षक आणि ग्रामस्थांनी या दातृत्वपूर्ण कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले. जांभुळकर यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि शिक्षणाबद्दलच्या तळमळीचा हा पुन्हा एक प्रत्यय आला आहे.