गणेशोत्सवात आवाज कोणाचा ? मुळशीकरांचाच…यंदाही मुळशीतील ढोल ताशा पथकांना पुण्यातील गणेश मंडळांकडून मोठी मागणी,

महावार्ता न्यूज ( संपादक- संजय दुधाणे) : डॉल्बी डीजे आले, शहरात तरूणाईची ढोल पथके आली तरी मुळशीतील अस्सल गावरान ढोल ताशा पथकांना यंदाही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांकडून मोठी मागणी आहे.
मुळशीतील ढोल लेझीम होणारा “कर्र…..कटक” आवाज गणरायाच्या आगमनानिमित घुमला. शहरालगत असलेल्या भुकूम, पिरंगुट, पौड, उरवडे, भादस मुळशी, माले,दारवली, खारवडे, सावरगांवसह इतर गावांच्या पथकांना यंदाही मोठी मागणी आहे.

काळानुरूप काही बदल झाले असले, तरी आजही या पथकांमध्ये शेती आणि जोडव्यवसाय करणाऱ्या तरुणांचं प्रमाण मोठं आहे. काही तरुण शहरांमध्ये नोकरी किंवा शिकणारे आहेत. गणेशोत्सवापूर्वी आठ-दहा दिवस सराव करून ते विविध मंडळांकडून येणाऱ्या मागणीनुसार खेळ सादर करत आहेत. सुट्टी घेऊनही पुण्यातील अनेक जण मुळशीत आपल्या गावच्या पथकात सराव करताना दिसत आहे.
मुळशीत ढोल पथकातून लाखो रूपयांची उलाढाल होते. मिळणारं मानधन गावातील सामाजिक कार्य, गावजत्रा, शिवजयंती आणि गावातील मंदिरासाठी वापरले जाते.

एका झांज पथकामध्ये 50 ते 100 मंडळाचे कार्यकर्ते असतात ढोल, ताशा, झांज, घंटा यांचा वापर करण्यात येतो. गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने मुळशी तालुक्‍यातीलग्रामीण भागातील ढोल-लेझीम पथक रोज सराव करीत आहे. तरुण आणि आबालवृद्ध मिळून एकत्र गावोगावी ढोल लेझीम तसेच झांज पथके आजही जीवंत ठेवली आहेत. तासाला साधारणत 25 ते 30 हजार रुपये ही पथके घेत आहेत.

काही वर्षांपूर्वी उत्सव काळात डॉल्बीवर कर्णकर्कश्श गाणी लावण्याची प्रथा रुजू लागली होती. मात्र आता ढोलपथकांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यातही पारंपरिक ढोल-लेझीमपथके आपलं वेगळेपण आणि अस्तित्व टिकवून आहे. या पारंपरिक पथकांची पाळेमुळे पुणे जिल्ह्यातील मुळशीसह, मावळ, शिरूर, खेड, राजगुरूनगर या तालुक्यांमध्ये रुजलेली आहेत. गावच्या जत्रांमध्ये, ग्रामदेवतेच्या मिरवणुकीत ही पथके रात्रभर खेळ सादर करतात. त्यानंतर ही झांजपथके महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत सण-उत्सवात आपली कला सादर करतात.
See also  आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या आदर्श मंडळ स्पर्धेचा बक्षीस समारंभ यंदा थेट मंत्रालयात