महावार्ता न्यूज ः उद्घाटनापासून वादग्रस्त ठरलेल्या पौडमधील मुळशी तहसीलदार कचेरीच्या नव्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. निधीअभावी काम थांबले असे समजल्याने आमदार शंकर मांडेकर यांनी ३ कोटींचा निधी मंजुरही केला. मात्र प्रत्यक्षात ठेकेदारांचे ५ कोटींचे बील थकले असल्याने हे काम गेल्या ८ महिन्यापासून रखडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महसूल दिनानिमित्त नव्या तहसील कचेरी बांधकामाला आमदार शंकर मांडेकर व तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी भेट दिली. सार्वजनिक बांधकाम विभागचे प्रभारी अधिकारी रणसिंग व ठेकेदार देसाई यांनी आमदार व तहसीलदार यांनी कामांची माहिती दिली. यावेळी मंजूर निधीतून खर्च झालेले बील ठेकेदारांला न मिळाल्याने काम थांबविण्यात आल्याची सांगण्यात आले. आमदार मांडेकर यांना निधीअभावी काम थांबले अशी चुकीची माहिती देण्यात आली होती. यामुळे त्यांनी तातडीने ३ कोटींचा निधीही मंजुर केला. ३ कोटी निधीतून काय कामे करणार असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर निधीअभावी नाहीतर ठेकेदारांचे ५ कोटींचे बील थकले असल्याने काम थांबवले असल्याचे ठेकेदार देसाई यांनी सांगितले.
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काळात मंजूर झालेली मुळशीतील नवे तहसील कचेरीचे बांधकाम पाया खोदल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. १४ कोटी मंजुर केलेल्या या तहसील कचेरीची काँग्रेस व राष्ट्रवादीकडून भूमीपूजनही झाली. काम सुरू होताच चुकीचा कॉलम उभा केल्याने हे बांधकाम थांबविण्यात आले. कॉलम दुरूस्त करून २०२४ मध्ये सिव्हिल काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या या पूर्ण झालेल्या १० कोटी कामापैकी ५ कोटीचे बील निघाले असून उर्वरीत ५ कोटी रक्कम न मिळाल्याने ठेकेदार देसाई यांनी काम थांबवले आहे.
नव्या तहसील कचेरीच्या बांधकामाबाबत आमदार शंकर मांडेकर ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. ठेकेदारांचे बील तातडीने अदा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या आहेत. नवे तहसीलदार चोबे यांना देखिल पाठपुरावा करण्याबाबत सूचीत केले आहे.
नवे कारभारी करणार उद्घाटन
वर्षभरात नवे आमदार व नवे तहसीलदार यांच्या हस्ते उद्घाटन होणार हे विधिलिखित असल्याने काम रखडले अशी कुजबुज बांधकाम भेटीच्या वेळी सुरू होती. आता १७ कोटी मंजुर असल्याने २०२५ मध्ये तरी बांधकाम पूर्ण होईल हि अपेक्षा मुळशीकरांची आहे.