मारुंजी ग्रामस्थांचा रस्ता रुंदीकरणाला विरोध; पर्यायी मार्ग आणि योग्य मोबदल्याची मागणी

महावार्ता न्यूज: रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत हिंजवडी, माण पाठोपाठ मारुंजी (ता. मुळशी) ग्रामस्थांनी  विशेष ग्रामसभा बोलावून प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शविला. गावठाणातील रस्ते रुंद करण्यामुळे गावाच्या जुन्या घरांचा, मंदिरांचा आणि सांस्कृतिक वारशाचा भाग धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
विकासाच्या नावाखाली गावाच्या हृदयात हस्तक्षेप न करता पर्यायी मार्ग शोधण्याची आणि योग्य आर्थिक मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. गावाने आयटी पार्कच्या उभारणीसाठी जमिनी दिल्याने परिसरात भव्य आयटी पार्क उभे राहिले. परंतु, या विकास प्रक्रियेत टाउन प्लॅनिंगचा पूर्णपणे अभाव होता. रस्त्यांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज, शाळा आणि रुग्णालय यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम म्हणून आज गावाला तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले.
या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाने गावठाणातील रस्ते रुंदीकरणाचा घाट घातला परंतु विकास हवा मात्र, ग्रामस्थांच्या भावना पायदळी तुडवू नका असे म्हणत रस्ता रुंदीकरणाऐवजी पर्यायी मार्ग तयार करावेत आणि रस्त्याची रुंदी २४ मीटर ठेवावी. तसेच, रुंदीकरण आवश्यक असल्यास, प्रभावित ग्रामस्थांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलन करण्याची तयारीही दर्शवली आहे. सभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
See also  मुळशीत लायन्स क्लब लोणावळाकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप