मुळशीतील हेमंत ववलेंकडून क्रांतिकारकांच्या जीवनावर माहितीपटही निर्मिती, पुण्यात आज होणार प्रदर्शित

महावार्ता न्यूज: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करणारे स्वर्गीय पद्मश्री मोहन दादा रानडे यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्या वतीने, त्यांच्या जीवनाला आणि मोहनदादांच्या गोव्यातील स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला समर्पित असलेला माहितीपट आज पुण्यात प्रदर्शित होत आहे. या माहितीपटाची निर्मिती मुळशीतील भरे गावचे सुपुत्र हेमंत ववले यांनी केली आहे.
मोहनदादा रानडे या प्रखर स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या इतिहासाच्या पानावर अमिट छाप सोडली आहे. संस्थेने, त्यांच्या त्यागाला आदरांजली म्हणून, गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाबद्दल जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने एक माहितीपट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

माहितीपटाचे कार्यकारी निर्माते हेमंत ववले यांनी सांगितले की, “नवीन पिढीला गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील नायक श्री मोहनदादा रानडे यांच्या विलक्षण आणि आदर्श जीवनाची ओळख करून देणे हा या माहितीपटाचा उद्देश आहे.”
“गोवा मुक्तीसाठी मोहनदादा यांच्या अतुट वचनबद्धतेची हृदयस्पर्शी आठवण म्हणून हा माहितीपट महत्वाची भुमिका बजावेल आणि गोवावासीयांच्या नवीन पिढीला प्रेरणा देईल,” असे मत जीवनज्योत संस्थेचे सचिव श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
श्री वामन प्रभू, ज्योती कुंकोलीकर, सावनी शेट्ये, मंदार तळावलीकर आणि संजीव सरदेसाई असे गोव्यातील विख्यात अभ्यासक, मोहनदादाच्या जीवनाचे आणि कार्याचे चित्रण सुनिश्चित करण्यासाठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत.
निखिल दीक्षित हा माहितीपट दिग्दर्शित करीत आहेत तर पंकज पाटील या सहाय्यक दिग्दर्शक आणि संकलक आहेत.
सत्य घटनांवर आधारीत माहितीपट, दृकश्राव्य कला आणि माध्यमाच्या मोहक मिश्रणातून श्री मोहनदादाचा जीवन प्रवास सहजतेने अधोरेखीत होईल. जीवनपट , वैयक्तिक अनुभव आणि मोहनदादांच्या जीवनावरील सामाजिक सांस्कृतिक प्रभावाचा सखोल उलगडा या माहितीपटातुन होईल असे मत निखिल दिक्षित यांनी व्यक्त केले.
मोहनदादा यांच्या ‘सतीचे वाण ‘ या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचे प्रदर्शन 18 डिसें रोजी पुणे येथे होणार आहे. स्क्रीनिंग मोहनदादाच्या चिरस्थायी वारशाला श्रद्धांजली आणि गोव्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन असणार आहे.
See also  पेरिविंकलचा विराज “आम्ही जरांगे” या चित्रपटात झळकणार, छोट्या मनोज जरांगेंच्या भूमिकेत विराज