मुळशीचा आवाज जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात घुमणार , लवळयाचे सुपुत्र पंडित संजय गरुड यांचे दुसऱ्यांदा शास्त्रीय गायन, मुळशीकरांना साथसंगतीची संधी

महावार्ता न्यूज ः  जगप्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मुळशीचा आवाज घुमणार असून लवळे गावचे सुपुत्र पंडित संजय गरुड हे दुसऱ्यांदा शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. त्यांना साथसंगत करण्याची दुर्मीळ संधीही 3 कलाकारांना लाभली आहे. 

पुणे येथे  13  ते 17 डिसेंबर 2023 रोजी 69 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार आहे. या जगविख्यात अशा महोत्सवात ज्येष्ठ व नवोदित कलाकारांच्या कलेचा आनंद घेण्यासाठी जगभरातून संगीत प्रेमी येतात. मुळशीकरांना आनंददायी व प्रेरणादायी अशी बाब म्हणजे अशा महोत्सवात मुळशी तालुक्यातील लवळे गावचे सुपुत्र पंडित संजय गरुड हे दुसऱ्यांदा शास्त्रीय गायन सादर करणार आहेत.  तालुक्यातील  3 कलाकार त्यांना या महोत्सवात साथसंगत करणार आहेत. शिरवली गावचे माऊली फाटक पखावजाची तर निवेचे सचिन चोरघे टाळ व गायनसाथ भुकूमचे दिनेश माझिरे हे करणार आहेत.

मुळशी तालुक्यातील लवळे येथील अति सामान्य कुटुंबातील संजय गरुड यांनी जगप्रसिद्ध अशा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात जिद्द, चिकाटी व कलेविषयीची लगन याच्या जोरावर महोत्सवात स्थान मिळवून गरुड झेप घेतली आहे. गरुड यांचे आजोबा ह.भ. प. श्री मारुतीराव गरुड हे एक प्रसिद्ध प्रसिद्ध पखवाज वादक होते तर वडील चंद्रकांत गरुड हे सांप्रदायिक भजन गायक होते .हा सांप्रदायिक वारसा संजय यांच्याकडे आला. पिरंगुट इंडस्ट्रीज काही काळ काम करत असताना गाण्याचा रियाज होत नाही व बारा बारा तास काम करून

मिळेल त्या वेळात रियाज करणे यात काही तथ्य नसल्याने व आपल्याला गायक म्हणून नाव कमवायचे असेल तर काम सोडून चांगल्या गुरूंकडे शिक्षण घेतले पाहिजे हे विचार सतत सुरू असायचे.एक दिवस काम सोडण्याचा निर्णय पक्का करून त्याबाबत वडिलांना सांगितले पण त्यास घरातून विरोध झाला . मला चांदणी चौकाच्या खाली जाऊ द्या मी कुठल्याही परिस्थितीत आपल्या घराण्याचे ,गावाचे आणि तालुक्याचे नाव कमवीन. मग त्यासाठी वाटेल ते काम करील अशी आई-वडिलांची समजूत काढून त्यांनी गाव सोडले. पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला दिवसभर अनेक छोटी मोठे कामे करून आपला उदरनिर्वाह करत राहिले. यात त्यांचे आठ आठ नऊ नऊ तास जायचे पण आनंद एवढाच होता की सायंकाळी सहा नंतर पुण्यातील विविध ठिकाणी शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकायला मिळत असत. मोठमोठे गायक वादक लांबून का होईना पाहायला व ऐकायला मिळायचे. त्याकाळी सवाई गंधर्व महोत्सवामध्ये रात्री बारानंतर मुक्त प्रवेश दिला जात असे. तेव्हा ते आत जाऊन गायन ऐकायचे त्यावेळी त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नसायचे. त्यांनी अनेकदा प्रवेश दाराबाहेरूनच अनेक गायक वादक कलाकारांना ऐकले आहे. हे करत असताना सातत्याने अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू होता आणि लवकरच त्यांनी गायनातील संगीतविशारद ही पदवी मिळवली. आपण संगीत विद्यालय सुरू करावे असा विचार मनात घोळत असतानाच आनंदाची गोष्ट घडली .

See also  पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल ग्रुपच्यावतीने  शिवजयंती साजरी, मोहनराव दुधाणेंकडून शिवभक्तांना शुभेच्छा

सवाई गंधर्व यांचे नातू व पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य असलेले गुरुवर्य पंडित श्रीकांत देशपांडे यांची भेट झाली. त्यांचे शिष्यत्व मिळाल्यानंतर किराणा घराण्याची गायकी शिकण्याची इच्छा पूर्ण झाली. वयाच्या 23 व्या वर्षी गुरुजींकडे किराणा घराण्याच्या घरंदाज गायकीची तालिम सुरू झाली. सुरुवातीला गुरुजींनी फारसे लक्ष दिले नाही कारण त्यांच्याकडे अनेक जण येऊन गेले असतील. त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते सर्वांना गाणे ऐकायला लावायचे पण गायला द्यायचे नाहीत. एकदा रियाज सुरू असताना त्यांनी संजय कडे पाहून सूर लावण्यासाठी खूण केली. सूर ऐकून गुरुजींना फार समाधान वाटले. हा मुलगा शास्त्रीय संगीतात उत्तुंग कार्य करीन असा विश्वास त्यांना वाटला आणि त्याच काळात गुरुजींच्या आशीर्वादाने त्यांनी ब्रह्मनाद संगीत विद्यालय धायरी येथे त्यांनी सुरू केले आणि पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे आर्थिक स्थिरता येऊ लागली. २००० सालच्या सवाई गंधर्व महोत्सवात देशपांडे गुरुजींनी स्टेजवर सूर लावण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी कसलेल्या गवया सारखा सूर लावला. त्यांचा सूर ऐकून उपस्थित रसिकांकडून भरपूर वाहवा व दाद मिळाली.
भारतातील सवाई गंधर्व महोत्सवा बरोबरच पंडित संजय गरुड यांनी संकल्प संगीत महोत्सव अहमदाबाद, स्वरभास्कर संगीत महोत्सव पुणे, तानसेन संगीत महोत्सव ग्वाल्हेर, पंडित फिरोज दस्तूर संगीत महोत्सव छत्रपती संभाजीनगर, पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव गोवा, स्पंदन संस्था गुजरात, बडोदा , वापी , सांस्कृतिक कार्य संचनालय महाराष्ट्र शासन प्रस्तुत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव ,प्रभादेवी, मुंबई गुणिजन संगीत महोत्सव इंदोर, कलकत्ता ,दिल्ली, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश, अशा अनेक मोठमोठ्या महोत्सवात त्यांनी आपले गायन सादर केले आहे, तसेच ते ऑल इंडिया रेडिओ व दूरदर्शन मुंबई चे मान्यता प्राप्त गायक आहेत. तसेच त्यांना आतापर्यंत मुळशी तालुक्यातील मुळशी भूषण,मुळशी रत्न पुरस्कार, कोल्हापूर करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते संगीत कला विभूषण पुरस्कार, रोटरी क्लब पुणे संगीत रत्न, पुरस्कार महाराष्ट्र जर्नलिस्ट संगीत रत्न पुरस्कार, महात्मा फुले विद्यानिकेतन व बचपन वर्ड फोरम पुणे राष्ट्रीय समाजकार्य पुरस्कार, कला महर्षी बाबुराव पेंटर पुरस्कार ,श्रीदत्त दिगंबर पीठ छत्रपती संभाजीनगर धर्मभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे त्यांचे सिंहगड रोड धायरी येथे ब्रह्मनाद कला मंडळ ही संस्था व ब्रह्मनाद संगीत महाविद्यालय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरातील आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी त्यांच्या संस्थेत गायन वादन व नृत्याचे शिक्षण घेत आहेत .

See also  पेरिविंकलमध्ये ख्रिसमस संध्यानिमित्त मुलांची धमाल, शेकोटीचा कार्यक्रम करणारी ठरली मुळशीतील पहिलीच शाळा

आत्तापर्यंत केलेल्या संगीत सेवेचे फळ म्हणूनच त्यांना यावर्षीही बुधवार दि. 13 डिसेंबर 2023 रोजी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गायन सेवा करण्याची संधी मिळाली आहे .ज्या मातीने त्यांना घडविले त्या मुळशी तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य संगीत महाविद्यालय सुरू व्हावे ,व त्याद्वारे आपल्या तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्याची इच्छा यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली.