पालकमंत्री अजित पवार यांचा पीएमआरडीए बैठकीत निर्णय
प्रा.संजय दुधाणे, संपादक
महावार्ता न्यूज: महिन्याभरापासून रस्ता रुंदीकरणाबाबत पीएमआरडीए विरूध्द हिंजवडी, माण ग्रामस्थ लढ्याला अखेर यश आले आहे. गावठाणातील रस्ते 24 मीटर, मधुबन ते शिवाजी चौक 30 मीटर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयातील बैठकीत घेतला.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा असे शासकीय यंत्रणांना निर्देशही पवार यांनी दिले.
पीएमआरडीएतील बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, माजी सरपंच सागर साखरे, संतोष साखरे, श्यामराव हुलावळे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयटीतील काही प्रस्तावित रस्त्यांबाबत तसेच गावठाणातुन जाणाऱ्या रस्त्यांना विरोध करत हिंजवडी, माण, मारुंजी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा बोलावून आपले पुढील भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांनी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी विनंती केली होती त्यानुसार आज सकाळी अजित पवार यांनी पीएमआरडीए कार्यालयात आयटीतील ग्रामस्थांची संवाद साधला.आमदार शंकर मांडेकर यांच्या ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केल्यामुळे पालकमंत्री पवार यांनी निर्णयाला हिरवा कंदील दर्शविला.
बैठकीत मधुबन हाॅटेल ते शिवाजी चौक रस्ता 36 मीटर ऐवजी 30 तर स्मशान भूमी ते शिवाजी चौक 24 मीटर आणि माण गावठाणातील रस्ते 24 मीटर करण्याबाबत चर्चा झाली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ते करावेत अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
गुरूवारी हिंजवडी-माण रस्त्यावरील रुंदीकरणाच्या कार्यवाहीनंतर राडारोडा उचलण्यासाठी पोलीस बंदोबस्तात दाखल झालेल्या पीएमआरडीए पथकाला स्थानिक जागा मालकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले होते. जागा मालकांनी “आधी मोबदला द्या, जागा मोजून द्या, मगच ताबा घ्या” अशी मागणी करत राडारोडा हटवण्यास विरोध दर्शवत ठिय्या आंदोलन केले होते. पीएमआरडीए आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार जागा मालकांना टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर आंदोलक शांत झाले.
सलग दुसर्या दिवशी पीएमआरडीए विरूध्द हिंजवडी-माण ग्रामस्थांना मोठे यश मिळाल्याची चर्चा मुळशीतील रंगली आहे.