भुकूममध्ये आज सीतामाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, नामस्मरण 

महावार्ता न्यूज ः प्रेमनिधी संत सीतामाई गणोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मुळशीतील भुकूम मठात रविवार 3 मार्च रोजी किर्तन व नामस्मरण होणार आहे. 
श्री क्षेत्र भुकूम येथील हरिराम आश्रय मठात अखंड नामस्मरण सप्ताह सुरू आहे. संत सीतामाईंच्या पुण्यस्मरण दिनी किर्तनाने या नामस्मरण सप्ताहाची सांगता होणार आहे. भुकूममधील हभप राजश्री माझिरे यांचे किर्तन संध्याकाळी 7 ते 9 वाजता होणार आहे. सकाळी 9 ते 11 प्रेमनिधी संत सीतामाईंच्या समाधीवर अभिषेक व महापूजा होईल. दुपारी 5 पर्यंत अखंड नामस्मरण केले जाईल. 

प्रेमनिधी संत सीतामाईंची संक्षिप्त चरित्रगाथा 

॥ आई सीतामाई सर्वांची माऊली ॥
॥ कनवाळू कृपाळू प्रेमाची साऊली ॥
सात्त्विक, सदाचारी, दासपंथी वारे कुटुंबात 15 ऑगस्ट 1922 या शुभदिनी संत सीतामाईंचा जन्म झाला. वडील शंकरशेठ व आई जानकीबाई यांच्यामुळे कोवळ्या वयातच सीतामाईंना परमार्थाचे बाळकडू लाभले. आईंच्या आध्यात्मिक विकासाचा शुभारंभ बालपणीच कृष्णसाक्षात्काराने झाला होता. हा आध्यात्मिक वटवृक्ष बहरला तो श्री गणोरे बाबांच्या दिव्य सानिध्यात. घरकामाबरोबरच आई पुण्यात येण्यापूर्वी नियमित साधना करीत असत. आईंची सर्वांत मोठी साधना म्हणजे श्री बाबांची सेवा. या सेवेच्या माध्यमातून त्यांचे दाम्पत्यजीवन परिपूर्ण झाले. आईंच्या जीवनातून जगाला हेही उमजले, की स्त्रीने ब्रह्मदृष्टीने आपल्या पतीची सेवा केली म्हणजे तिचे जीवन कृतार्थ होऊ शकते. रोजच्या कामामध्ये मग्न असलेल्या आईंचा हा महिमा लोकांना ओळखता येत नसे.
संत सीतामाई नाशिकमधील ध्येयवादी तरूण श्रीराम गणोरे यांच्याशी 1935 मध्ये विवाहबद्ध झाल्या. या शुभमंगल कार्याचा खर्च श्री बाबांनी स्वकष्टाजिर्र्त पैशांनी केला. फक्त 80 रूपयांमध्ये लग्नसोहळा पार पडला. लक्ष्मीच्या पावलांनी सौ. सीता घरात येताच श्री बाबांच्या शिंपी व्यवसायाची भरभराट झाली. लग्नानंतर मातृभूमीच्या स्वातंत्र्य लढयात उडी घेतल्याने श्री गणोरे बाबांचे संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. काँग्रेसच्या काही अधिवेशनांना व शिबिरांना ते पत्नी सीतेसह जात असत. काही काळ सौभाग्यवती सीताही श्री बाबांच्याबरोबर भूमिगत होत्या. आपल्या ध्येयवेड्या पतीच्या कार्याला सीतामाईंनी कधीच विरोध न करता समर्थ साथच दिली. श्री गणोरेबाबांच्या साधनेत सीतामाईंची भूमिका एका साधकासारखी होती. आपले पती दिव्य शक्तीच्या मार्गावर असल्याचे सीतामाईंना क्षणोक्षणी वाटे. आपले अनुभव श्री बाबा माईंना सांगत. तेव्हा माईही त्या अनुभवात समरस होत. आपल्या पतीचा ईश्वरी भाव पाहून साक्षात पांडुरंगाची आपण सेवा करतोय, असे सीतामाईंना वाटे
सीतामाईंचा आपल्या पतीवरही परमेश्वराइतकाच दृढ विश्वास व श्रद्धा होती. त्यांनी श्री गणोरेबाबांच्या सानिध्यात आलेल्या सर्व माणसांवर प्रेमाचा वर्षाव केला. पुण्यात कर्वे रोडवरील कचरेवाडीत संसार थाटल्यापासून त्यांना लोक ‘आई ’ या नावानेच संबोधू लागले. श्री बाबांच्या दिव्य सहवासातील लोकांच्या त्या माऊली, आईच बनल्या होत्या. संत गणोरेबाबांच्या महानिर्वाणानंतर आईंनी श्री बाबांचा वारसा पुढे समर्थपणे पेलला व चालविला. आई दुसर्यांसाठी जगली, इतरांसाठीच झिजली. आईंचा अवतार विश्वमातृत्वाचा आविष्कार करून देण्यासाठीच झाला होता.
श्री बाबांच्या समाधीनंतर मठ ओस पडला नाही. उलट दिवसेंदिवस बहरतच गेला. श्री बाबांच्या भक्तांचे येणे-जाणे सुरूच राहिले. हळूहळू आई भक्तजननी झाल्या. श्री बाबांच्या ओढीने भक्त त्यांच्याकडे येत असत आणि त्यांच्याकडून त्यांना आध्यात्मिक चेतना मिळत असे. पण त्या सार्या भक्तांना स्वयंपाक खोलीतून असा काही प्रसाद मिळू लागला, की सर्वांना या पाकदेवतेचे दिव्य मातृत्व जाणवू लागे. अध्यात्माचे नंदनवन असलेला हरिराम आश्रय मठ प्रेमाच्या अधिष्ठानावर उभा आहे. यासाठी संत गणोरेबाबांना कोणत्याही सिद्धीचा, गूढ ज्ञानाचा, सामर्थ्याचा वापर करावा लागला नाही. श्री बाबांनंतर प्रेमनिधी सीतामाऊलींनी फक्त प्रेमानेच माणसे आपलीशी केली व येणार्या भाविकांनी प्रेमानेच मठाच्या उभारणीला हातभार लावला. या प्रेमळ झर्याचा मुलाधार म्हणजे आईंचे अन्नक्षेत्र.
आईंकडे श्री बाबांप्रमाणेच सर्व समाजांतील, धर्मांतील भक्त मोठ्या प्रेमाने येत. आई मुक्त हृदयाने आलेला कोणीही असो त्याच्यावर प्रेमवर्षाव करीत. या प्रेमाने चिंब झालेल्या भक्तांना जीवनात नवा आनंद मिळे. श्री बाबांनंतर आपल्या समस्या, अडचणी, अडथळे आईंना भक्तमंडळी सांगू लागली. श्री बाबांच्या ‘ॐ हा गुरू’ ग्रंथाच्या आधारे भक्तांच्या अडचणींवर आई क्षणात मार्ग काढीत. श्री बाबांचे ओंकाराचे तत्त्वज्ञान आईंना उमजले होते. ‘ॐ हा गुरू’ हा ग्रंथ त्यांना मुखोद्गतच होता. त्यांच्या आध्यात्मिक सेवेची श्री बाबांनी दिलेली तीच अमूल्य शाश्वत शिदोरी होती.
आलेल्या भक्तांची कोणतीही समस्या जाणून घेतल्यानंतर आई मंत्रदीक्षा द्यायची. परंतु यात त्यांनी कधीच अंधश्रद्धा येऊ दिली नाही. श्री बाबांचा आध्यात्मिक पायावरचा विज्ञानवादी दृष्टिकोनच आईंनी जगाला दिला.
काय आहे आपुल्या हाती ।
कोण येते संगती । तेच ॐ नाम ॥
हाच दिव्य संदेश देण्यासाठी सीतामाईंचा भूतलावर जन्म होता. सारे जग गाढ निद्रेत असताना भल्या पहाटे आई सीतामाईंचा दिनक्रम सुरू होत असे. जाग आल्यावर त्या उठत. श्री बाबांना वंदन करीत. जपाला बसत. रोज पहाटे 15 देवांचा 1500 जप आई अखंडपणे करीत. परमेश्वराच्या नामात समाधिस्थ झाल्यानंतर आई सर्व तीर्थांना नमस्कार करीत. आई ब्रह्मांडातील 33 कोटी देवदेवतांना वंदन करीत नसे, तर भक्तांच्या जीवनात सुख, समाधान, शांती नांदो, असेच जणू या सर्व देवतांना साकडे घालीत. भक्तांकडून पूजेला विसर पडला तरी त्यांची पूजा आई करी. आपल्या लेकरांच्या जीवनात समृद्धीचे दीप उजळण्याकरिता आईंची तपश्चर्या भल्या पहाटेपासून चालत असे.
प्रेमनिधी संत गणोरेबाबांप्रमाणेच जगद्गुरू तुकाराम-महाराजांच्या सीतामाई भक्त होत्या. संत तुकाराममहाराजांच्या गाथेस आईने आपले जीवन अर्पित केले होते. पहाटेची साधना झाल्यांनतर आई दिवसभर जेव्हा-जेव्हा वेळ मिळे, तेव्हा तुकाराम गाथा वाचत असे. आध्यात्मिक वाटचालीत तीर्थक्षेत्रांचे दर्शन हे साधनेचे एक अंग असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी तळमळणार्या सीतामाईंची सार्या भारतभर तीर्थयात्रेची साधना झाली होती.
आईंचे जीवन हे शुद्ध आचार, शुद्ध विचार असे प्रेमाने ओथंबलेले होते. कोणीही माणूस मठात येवो, भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी देऊन त्याचा आत्मा तृप्त करणे, एखादा परमार्थाच्या वाटेत असेल, तर साधनेतील त्याची अडचण दूर करून त्याला परमानंद देत, कारण प्रेम हेच ईश्वर आहे. मनुष्याने प्रेमानेच जगाला जिंकले पाहिजे. प्रेम आपले मूळ स्वरूप आहे. प्रेमाशिवाय जगात श्रेष्ठ असे काय आहे असे आई नित्य वदत.
राम राम म्हणती सारे ।
परी वर्म न ठावे कोणा रे ॥
‘‘परमार्थ काय आहे, हे समजावून घ्या व तसे आचारण करा. रामनाम घ्या, पण त्यातील वर्म माहीत करून घ्या. सर्वांठायी समभाव ठेवा. तुम्ही आनंदित राहा आणि इतरांनाही आनंदित ठेवा. तुमच्यापासून दुसर्याला दु:ख होणार नाही असे वागा, समाधानी राहा आणि दुसर्याला समाधान द्या. दीन-दुबळ्यांची सेवा करा. दिवसातील काही वेळ नियमित नामस्मरण करा.’’ अशा अनेक पारमार्थिक गोष्टी आई बोलत होत्या. बोलता-बोलता मधूनच नाम घेत होत्या. रामाला विनंती करीत होत्या. पांडुरंंगाला विनंती करीत होत्या-मला नामातच राहू दे. मला माझा शेवट साधता येऊ दे. हा शेवटचा दिव्य संदेश देत सीतामाई माघ वद्य सप्तमी, गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी 2004 रोजी अनंतात विलीन झाल्या.
See also  मुळशीतील पूर्व पट्टयात संग्राम थोपटेंच्या प्रचारात उसळली गर्दी , माण, हिंजवडी, मारूंजीतही महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा