गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे.

 

कोल्हापूर ०६ प्रतिनिधी

जिल्हयातील तमाम शेतकरी परिवराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळ ची निवडणुक पार्श्वभूमी वर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनी सह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी सांगितले . पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेली भूमिका अशी –
लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.
माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.
म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.
गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना.
गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.
मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
या विचारला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक 8 जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे .

See also  मुळशी ते भोर व्हाया वेल्हा 24 फेऱ्यांचा सकाळी 11 च्या आत निकाल अपेक्षित, थोपटे की मांडेकर-कोण ठरणार बाजीगर