खाशाबांच्या अदभूत कथा – 1
स्वातंत्र्यसैनिक खाशाबा
देशाचा आज 78 वा स्वातंत्र्यदिन. स्वतंत्र भारतासाठी ऑलिम्पिकमधील पहिलेवहिले पदक कराडच्या खाशाबा जाधप यांनी जिंकले. त्यापूर्वी खाशाबांनी देशस्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. त्याची प्रा. संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यां पुस्तकातून घेतलेली ही अदभूत कथा….
जयहदचा नारा देशभर घुमत असताना खाशाबांचे शिक्षण चालू होते. 1942 च्या चले जाव चळवळीतील घटनांवर खाशाबांचे बारकाईने लक्ष होते. या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपणही काहीतरी करण्याची ऊर्मी खाशाबांमध्ये जागृत झाली होती. परीक्षेच्या काळात ते घरी जात नसत. शाळेतील एका वर्गात दूरवरच्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली जायची. हदूराव मोहिते व खाशाबा हे अभ्यासासाठी शाळेतच मुक्कामाला असत.
1942 च्या चलेजाव चळवळीत क्रांतिकारकांना अटक करण्याचे सत्र देशात सुरू होते. या काळात कराडमधील क्रांतिकारक भूमिगत झाले होते. या भूमिगत क्रांतिकारकांना रात्री खाशाबा आपल्या खोलीवर लपवून ठेवत असत. भूमिगतांना आश्रय देऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलला होता. इंग्रज सरकार विरोधी मजकूर असलेले बुलेटिन्स (पत्रके) शालेय विद्यार्थी गावोगाव वाटत. ही बुलेटिन्स वाटण्याची कामगिरी खाशाबा आनंदाने पार पाडी.
कराडमध्ये राहत असताना भूमिगतांना आश्रय देऊन व बुलेटिन्स वाटून खाशाबांनी स्वातंत्र्य चळवळीस थोडा हातभार लावला होता. याचे त्यांना आंतरिक समाधान वाटत होते. या देशसेवेबद्दल त्यांना मारही खावा लागला. भूमिगतांना शाळकरी पोरे आश्रय देत असल्याचे त्यावेळचे कराडचे फौजदार वालावलकर यांच्या कानी आले. त्यांनी खाशाबा व हदूराव मोहिते यांना चौकीवर बोलावून घेतले. चौकीत पोरे येताच वालावलकर दमदाटीने म्हणाले, भूमिगत कुठे गेले ते सांगा खाशाबा व हदूराव काहीच बोलले नाहीत. वालावलकरांने या दोन छोट्या जवानांच्या श्रीमुखात दिली. गाल लाल झाले. खाशाबांना रडू कोसळले. पोरांना रडताना पाहून फौजदारांनी त्यांना सोडून दिले. खाशाबांनी भूमिगतांचा नाव, पत्ता सांगितला नाही. स्वातंत्र्यसंग्रामात देशसेवेची छोटी भूमिका खाशाबांनी केली होती.
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला.देशात मोठ्या उत्सवात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. हा ऐतिहासिक दिवस पाहण्याचे भाग्य खाशाबांना मिळाले होते. राजाराम महाविद्यालयात तिरंग्याला सलामी देताना आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना खाशाबांमधे जागृत झाली होती.