


अलंकापुरी आळंदीत चैतन्य आणि भक्तीची उधळण : मानाच्या अश्वांचे पूजन !
कोल्हापूर / आळंदी ( राजेंद्र मकोटे ) वर्षभर ज्या क्षणाची वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पहातात अखेर तो क्षण आला असून संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने आळंदी भाव-भक्तीने सजली आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’आणि ‘माऊली-माऊली’च्या गजरात संपूर्ण अलंकापुरी आळंदीत चैतन्य आणि भक्तीची उधळण होत आहे. आळंदीचे समाधी मंदिर अत्यंत विशेष फुलांनी सजवलेले असून ‘माऊली-माऊली’ आणि ‘विठोबाचा प्राणसखा’, अशा अक्षरे फुलांनी कोरलेली आहेत. सकाळी प्रमुख विश्वस्तांच्या उपस्थितीत मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी श्री योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळाप्रमुख डॉ. राजेंद्र उमाप, अधिवक्त्या रोहिणीताई पवार यांसह अन्य उपस्थित होते.
या वारीसाठी बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या मोती आणि जरी पटक्याचा अश्व हिरा हे येतात. ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व अंकली येथून आळंदी येथे येतात. ही परंपरा गेल्या १९४ वर्षांपासून चालू आहे.













