कोल्हापूरच्या विकासासाठी रेल्वे हद्दवाढ गरजेची; सर्वेक्षण अहवाल मिळवून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

कोल्हापूर–संकेश्वर–बेळगाव नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण अहवालासाठी जिल्हाधिकारी विजय राठोड यांचे आश्वासन

कोल्हापूर 12 (राजेंद्र मकोटे)
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला गती द्यायची असेल, तर कोल्हापूर रेल्वेची हद्दवाढ होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांची भेट घेऊन रेल्वे हद्दवाढीसंदर्भात चर्चा केली. तसेच कोल्हापूर–संकेश्वर–बेळगाव या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मिळवून देण्याची मागणी केली.

कोल्हापूर–संकेश्वर–बेळगाव नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण मोनार्क इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीकडून करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल उपलब्ध झाल्यास कोल्हापूर रेल्वे हद्दवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला मदत होऊ शकते. त्यामुळे हा अहवाल दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून मागवून घेण्यात यावा, अशी विनंती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी विजय राठोड यांना करण्यात आली.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटकातील हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाला पत्र पाठवून सर्वेक्षण अहवाल मागवून घेण्याचे आश्वासन दिले.

शक्तिपीठ महामार्गाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी

यावेळी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासंदर्भातील विविध कागदपत्रे आणि अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणीही संघाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्रकल्पाची प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक व पर्यावरणीय माहिती, भूसंपादनासंबंधीची कागदपत्रे, संरेखनाचे नकाशे, अहवाल तसेच गावनिहाय माहितीचा समावेश आहे.

या सर्व माहितीमुळे प्रकल्पासंदर्भातील वस्तुस्थिती समजून घेणे आणि नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी ही मागणी मान्य करून संबंधित माहिती मागवून अहवाल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे हद्दवाढ आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत आवश्यक माहिती मिळविण्यासाठी संघाने पुढाकार घेतला आहे.

यावेळी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे सुनील कानूरकर, संजय कांबळे, सुनील नेसरीकर, देवगोंडा पाटील, मनवीर केसरकर, भरमू लडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  ऑलिम्‍पिक दिनानिमित्त सोमवारी पुण्यात भव्‍य दौड, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रात्‍यक्षिके