कोलंबो : भरतीय संघाने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि त्यासह त्यांनी आशिया कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १७२ धावांत आटोपला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कुलदीप यादवने यावेळी चार विकेट्स घेत विजयात पुन्हा मोलाचा वाटा उचलला.
भारताचे २१४ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण भारताच्या गोलंदाजांनी हे आव्हान श्रीलंकेसाठी कठीण करून ठेवले. कारण जसप्रीत बुमराने सुरुवातीला भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेला एकामागून एक धक्के दिले. बुमराने प्रथम श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाला सहा धावांवर बाद केले. त्यानंतर बुमराने भारताला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली ती कुशल मेंडिसची. कारण मेंडिस सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि तो एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी महत्वाची होती. बुमराने यावेळी मेंडिसला सूर्याकरवी झेल बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद सिराजने दिमुथ करुणारत्नेला बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला.