पिरंगुटच्या मशिदीत ‘बाहेरील मुस्लिमांना बंदी’; , ग्रामस्थांचा निर्णय

महावार्ता न्यूज: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षितसाठी संपूर्ण पिरंगुट गावाने एकत्र येऊन गावातील मशिदीत ‘बाहेरील मुस्लिमांना बंदीचा निर्णय घेतला आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. 
पिरंगुट ग्रामस्थांनी 1 मेच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीतल्या हॉलमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे.पिरंगुट मशि‍दीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी करत होते. त्यात येणारे लोक नेमके कोण आहेत हे ओळखता येण्याची शक्यता नव्हती. या लोकांकडे कसलेही आयडेंटीटी कार्ड नव्हते. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक मुस्लीम बांधवही या बैठकीला उपस्थित होते. 
पिरंगुटमध्ये शुक्रवारच्या नमाजसाठी येणाऱ्या लोकांचे आयडीप्रुफ स्थानिकांकडून तपासले जाणार असल्याचं पिरंगुटचे पोलीस पाटील प्रकाश पवळे यांनी सांगितलं. ते म्हणाले, ” ग्रामस्थ मंडळींची मिटींग झाली. त्यात मुस्लीम मराठा वगैरे सगळे होते. आमचं गाव एकोप्याचं आहे. शुक्रवारी बाहेरील लोक अधिक येत असल्याने रहदारीला अडथळा येत आहे. गावातील कॉलेजच्या मुला-मुलींना जायला रस्ताच मिळत नव्हता. त्यांनी तक्रार केल्यावर आम्ही मौलानांना विचारलं तर ते म्हणाले हे बाहेरचे आहेत. गेल्या दोन तीन शुक्रवार पासूनच यायला लागले होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर बंदी घातली. बाहेरच्या लोकांवर बंदी आहे.
स्थानिक मुस्लिमांच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचं सांगितलं जात असलं तरी पिरंगुट मशिदीचे पदाधिकारी आमिर यांनी बोलताना असा ठराव होणार आहे याची आपल्याला कल्पना दिली गेली नसल्याचं सांगितलं. बैठकीला उपस्थित असलो तरी अशी कोणाला बंदी कशी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
बंदीबाबत जाहीर सूचनेचा फ्लेक्सवरील मजकुर पुढीलप्रमाणे – 
पिरंगुट गावामध्ये बाहेरून येणार्‍या सर्व मुस्लीम बांधवांना कळवण्यात येते की, समस्त गावकरी मंडळी, पिरंगुट व स्थानिक मुस्लीम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये गावामधील मशि‍दीमध्ये स्थानिक मुस्लीम बांधव वगळता परप्रांतीय मुस्लीम बांधव, व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लीम बांधव व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लीम बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने मशि‍दीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
तसेच मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व शांतता यास अडथळा निर्माण होत आहे. तरी याठिकाणी फक्त स्थानिक मुस्लीम बांधवच प्रार्थना करतील याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लीम बांधवांनी नोंद घ्यावी.
– समस्त गावकरी मंडळी पिरंगुट 
See also  पिरंगुटमध्ये सातव्या मजल्यावरून पडल्याने पेपर विक्रेतेचा मृत्यू, मदतीसाठी मुळशीकर सरसावले