माले गावाचा विकासकामांचे श्रेय सरपंचांना मिळू नये यासाठी अपप्रचार, ग्रामस्थ सरपंचाच्या पाठीशी 

पौड : गावाचा विकास झाला तर त्याचे स्वागत करण्याऐवजी त्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माले ग्रामपंचायतीचे सरपंच सुहास शेंडे यांनी केला आहे. 
माले ग्रामपंचायतीला समृद्ध ग्रामविकास स्पर्धेत तालुक्यात बक्षीस मिळाल्यानंतर गावात झालेल्या विकासकामांचे श्रेय सरपंचांना मिळू नये, या राजकीय हेतूने काही जण तक्रारी करत असल्याचा आरोप सरपंच सुहास शेंडे यांनी केला आहे. मात्र, ग्रामपंचायतीने कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून ग्रामसभा शासनाच्या नियमानुसारच झाल्या आहेत. संबंधित चौकशीला पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

गावाचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा राजकीय गटाचा विषय नसून,  संपूर्ण गावाच्या प्रगतीशी संबंधित असतो. रस्ते, भूमिगत गटारे, पाणी अडविण्यासाठी बंधारे, ओढ्याचे खोलीकरण, शेतजमिनींचे संरक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शाळा अशी विविध विकास कामे करून गावचा केल्याचा उल्लेख सरपंच सुहास शेंडे यांनी केला आहे. 
ज्यांना गावातील प्रवेशद्वाराची कमान साधी रंगवता आली नाही, ते आज गावात झालेल्या कोट्यावधी रुपयांचा झालेला विकास पाहून जळफळाट होऊन तडफकत आहेत. गावामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीवरती ज्यांनी अनेक वर्ष सापासारखा ताबा आणला होता, त्यांना उघडे केल्याचा हा भडास काढला जात आहे. गावचा होणारा विकास पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि भविष्यात आपल्याला सत्तेचे स्वप्नही पाहता येणार नाही, याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे खोटे आरोप करत आहेत, मात्र खोट्या आरोपामुळे फक्त सरपंचाची नव्हे तर गावाची बदनामी होत आहे, याचसुद्धा या विरोधकांना भान राहिलेले नाही, असा टोला सरपंच सुहास शेंडे यांनी विरोधकांना लावला आहे. 
माले ग्रामपंचायतीला समृद्ध ग्रामविकास स्पर्धेत तालुकास्तरावर यश मिळाले आहे. तालुक्यातील मोठ्या शहरांच्या जवळ असलेल्या ग्रामपंचायतींच्या तुलनेत डोंगरदऱ्यांच्या परिसरातील माले ग्रामपंचायतीने हा सन्मान मिळविल्याचा अभिमान आहे. या पुरस्कारामुळे गावात झालेल्या विकासकामांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या यशाचे श्रेय सरपंचांना मिळू नये, या भावनेतून विरोधकांकडून तक्रारी केल्या जात आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीची रंगरंगोटी यांसारखी कामेही पूर्वी झाली नव्हती, असा दावा करत आता गावात झालेल्या मोठ्या विकासकामांमुळे काही जण अस्वस्थ झाल्याची टीका सरपंच सुहास शेंडे यांनी केली आहे.
ग्रामसभांबाबतच्या तक्रारींवर ग्रामपंचायतीचे स्पष्टीकरण
माले ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून ग्रामसभा शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसारच पार पडल्या आहेत. तक्रारी झाल्यानंतर घेण्यात आलेल्या ग्रामसभेत संबंधित बाबींबाबत ग्रामस्थांना विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी ग्रामस्थांनी ग्रामसभांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यासंदर्भात ठरावही करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पुढे असेही स्पष्ट करण्यात आले की, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासनाकडून मागविण्यात आलेली कागदपत्रे आणि खुलासे सादर केले जात आहेत. चौकशी यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य केले जात असून, शासनाच्या चौकशीतून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मंजूर लांबीपेक्षा अधिक काम 
ग्रामपंचायतीच्या कामांबाबत तक्रारदारांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे एका रस्त्याच्या कामासंदर्भातही तक्रार केली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. संबंधित रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडण्यासाठी मंजूर कामाच्या लांबीव्यतिरिक्त सुमारे ५० ते ५५ मीटर अंतराची आवश्यकता असल्याचे ग्रामपंचायतीच्या बाजूने सांगण्यात आले. रस्ता जोडण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करून घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या कामाबाबतही चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीत अनियमितता आढळली नसल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या समर्थकांनी केला आहे. 
*कामे बोलतात*
1) मुख्य रस्ता ते दत्तवाडी चार किलोमीटरचा सिमेंट काँक्रीट रस्ता
माले गावातील विकासकामांमध्ये मुख्य रस्ता ते दत्तवाडी या सुमारे चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा विशेष उल्लेख केला जात आहे. पूर्वी पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणेही कठीण होत असल्याचे सांगण्यात येते. आता या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने वाहतुकीला अधिक सुलभता मिळाले आहे. रस्ते हे गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे महत्त्वाचे माध्यम असतात. चांगल्या रस्त्यांमुळे शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा, रुग्णांना आरोग्यसेवा मिळविणे आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होतो. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाल्याने या अडचणी कमी करण्यास मदत होते. मुख्य रस्ता ते दत्तवाडी हा मार्ग गावातील दळणवळणाला चालना देणारा ठरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
2) भूमिगत गटारांमुळे स्वच्छतेला प्राधान्य
गावातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने भूमिगत गटारांची व्यवस्था महत्त्वाची ठरते. माले गावात उघड्या गटारांची समस्या दूर करून भूमिगत गटारांची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. उघड्या गटारांमुळे सांडपाणी रस्त्यावर येणे, दुर्गंधी पसरणे आणि डासांची उत्पत्ती होणे अशा समस्या उद्भवू शकतात. भूमिगत गटारांची योग्य रचना आणि नियमित देखभाल केल्यास सांडपाण्याचा निचरा अधिक व्यवस्थित होऊ शकतो.गावातील विकासाचा विचार करताना केवळ रस्त्यांचे काँक्रीटीकरण नव्हे, तर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सुविधांनाही महत्त्व दिले जात आहे. भविष्यातील लोकसंख्या आणि नागरी गरजा लक्षात घेऊन गटारांची व्यवस्था केली आहे.
3) प्रत्येक वस्तीपर्यंत अंतर्गत रस्त्यांचे जाळे
माले गावातील वाढीवस्त्यांमध्ये आणि अंतर्गत भागांत रस्ते निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक घरापर्यंत नागरिकांना सर्व ऋतूंमध्ये सहज पोहोचता यावे, या उद्देशाने अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात अंतर्गत रस्त्यांची सुविधा नसल्यास पावसाळ्यात चिखल, वाहतुकीतील अडथळे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वस्तीतील प्रत्येक भागाला मुख्य रस्त्याशी जोडणे महत्त्वाचे असते. ते काम झाले आहे. 
4) दुष्काळातही शेतीला आधार; बंधाऱ्यांची उभारणी
माले गावातील जलसंधारणाच्या कामांचा उल्लेख करताना बंधाऱ्यांच्या उभारणीला विशेष महत्त्व दिले जात आहे. सत्ता नसतानाही बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर करून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग करणे हा या कामांचा मुख्य उद्देश आहे. उपलब्ध भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बंधाऱ्यांची रचना करण्यात आली असून, गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांना पाणी उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याचा उपयोग अधिक प्रभावीपणे करता आल्यास पिकांचे नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.यामुळे माले गावातील बंधाऱ्यांची कामे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. 
5) ओढ्याचे खोलीकरण आणि संरक्षक भिंतींमुळे शेतीचे संरक्षण
माले परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने ओढ्याला पूर येऊन लगतच्या शेतीचे नुकसान होत असल्याची समस्या आहे. यावर उपाय म्हणून बंधाऱ्यांच्या कडेने आणि ओढ्यालगत संरक्षक भिंती उभारण्याची कामे करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार आणखी कामे केली जाणार आहे. याशिवाय, नाम फाउंडेशन, सकाळ सोशल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने सुमारे पाच किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण करण्यात येत आहे. ओढ्याच्या पात्रातील गाळ काढणे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे यामुळे पावसाळ्यातील संभाव्य नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.
6) गणेशनगरमधील सुविधांमध्ये बदल
गणेशनगरमधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी परिसरात रस्ते, गटारे आणि वीजव्यवस्थेचा अभाव होता. आता या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामे करण्यात आली आहेत. निधी मंजूर करून घेऊन ही कामे पूर्ण करण्यात सरपंचांनी पुढाकार घेतल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी गणेशनगरमधील जागेच्या मालकीवरून वाद निर्माण झाल्याचेही नागरिकांनी सांगितले. काही व्यक्तींनी जागा खासगी मालकीची असल्याचा दावा केल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागला आणि रस्ता रुंद करण्याच्या कामातही अडथळे निर्माण झाले, असा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावठाण मोजणी करून घेण्याच्या प्रक्रियेत सरपंचांनी पुढाकार घेतल्याने जागेच्या स्थितीबाबत स्पष्टता निर्माण होण्यास मदत झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गणेशनगरमधील गणपती मंदिराच्या छताला गळती होत असल्याची समस्या नागरिकांनी सरपंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंदिराच्या कामासाठी सहकार्य मिळाले आणि कामाला सुरुवात झाली, असेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
7) सीएसआर निधीतून भव्य शाळेची उभारणी
माले गावात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने सीएसआर निधीतून भव्य शाळेची उभारणी करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी शासनाचा निधी खर्च न करता कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, त्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि गावातील प्राथमिक शाळांबाबत पालकांचा विश्वास वाढावा, हा या प्रयत्नामागील उद्देश आहे. नियमित अभ्यासक्रमासोबत परकीय भाषांचे शिक्षण देत आहे. शाळेच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा झाल्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिकणारी काही मुलेही गावातील शाळेत प्रवेश घेऊ लागली आहे. शिक्षण क्षेत्रातील हा उपक्रम गावाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कारण चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक संधी अधिक सक्षम होतात.
…..
 ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित चौकशीला पूर्ण सहकार्य केले जात आहे. अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेली कागदपत्रे आणि खुलासे सादर करण्यात आले आहे. गावाच्या विकासासाठी निधी मिळविणे, कामे मंजूर करून आणणे आणि प्रत्यक्षात कामे पूर्ण करणे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी कामांनंतर तक्रारी करण्यात येत आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर करून विकासकामांमध्ये अडथळे आणले जात आहे.  सार्वजनिक कामकाजाबाबत माहिती मागविणे हा नागरिकांचा अधिकार असला, तरी त्याचा वापर राजकीय हेतूने करून विकास रोखण्याचा प्रयत्न होऊ नये. 
– सुहास शेंडे, सरपंच, माले 
..
नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे, अशी आमच्या गावातील विरोधकांची तर्‍हा झालेली आहे. गावचा विकास होण्यासाठी दारोदारी फिरून आणलेल्या निधीवरसुद्धा यांनी डोळा ठेवला आहे. गावात विकास होऊच नये, अशीच भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे. त्यामुळे गावाच्या विकास कामांसाठी जे मदत करत आहेत, त्यांनाच अडचणीत आणण्यासाठी माहिती अधिकाराचा गैरवापर करत आहेत. यातूनच यांचं गावाविषयी आणि गावाच्या विकासाविषयी नकारात्मक स्पष्टपणे दिसत आहे. गावातील विकास कामे याची देही याची डोळा पाहण्यासाठी  ग्रामपंचायत Facebook page भेट द्यावी 
– सुहास शेंडे, सरपंच, माले 
See also  मुळशीतील पूर्व पट्टयात संग्राम थोपटेंच्या प्रचारात उसळली गर्दी , माण, हिंजवडी, मारूंजीतही महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा