


महावार्ता न्यूज: मुळशी तालुका आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यंदा थेट मुंबई मंत्रालयात होणार आहे. तहसील कार्यालय,पौड पोलीस स्टेशन अंतर्गत आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या वतीने मागील तेरा वर्षांपासून तालुका स्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. दरवर्षी विजेत्या मंडळाना बक्षीस म्हणून रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच दरवर्षीचा बक्षीस वितरण सोहळा देखील अनोख्या पद्धतीने आयोजित केला जात असतो.
बक्षीस सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवरांना बक्षीस वितरण सोहळ्यासाठी निमंत्रित केले जात असते. मागील वर्षी विजेत्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना हेलिकॉप्टरमधून मुळशी दर्शन असे बक्षीस देण्यात आले होते.

याही वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती मंडळाचे संस्थापक माधवराव शेळके यांनी दिली. यास्पर्धेबाबत अधिक माहीती देताना शेळके म्हणाले की, स्पर्धेच्या माध्यमाने मुळशीतील तरुणामध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत असतो. मंडळाचा स्पर्धेतील उत्साह टिकून याकरिता त्यांना रोख पारितोषिकाबरोबरच वेगळ्या पद्धतीने बक्षीस वितरण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.















