महावार्ता न्यूज : रायरेश्वर किल्ल्यावरील महादेवाच्या चरणी लिन होऊन किरण दगडे यांनी भोर विधानसभेसाठी प्रचाराचा शड्डू ठोकला. तोच अपक्ष उमेदवार दगडांच्या किटलीची गरम हवा सार्य मतदारसंघात पसरली अहे.
रायरेश्वर किल्ल्यावरील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून जागतिक तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याचा पण त्यांनी यावेळी केला. भोर येथे झालेल्या प्रचारसभेत दगडे पाटलांनी त्यांच्यावर दबाव असल्याचा गौप्यस्फोट करून दबावाला झुकणार नाही असे ठणकावून सांगत भोर मतदारसंघातील मतदारांनी एक दिवस माझ्यासाठी द्या, मी आयुष्यभर सोबत असेन असे वचन दिले. यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेते प्रवीण तरडे, ज्येष्ठ नेते बबनराव दगडे पाटील, नवनाथ पारखी, शिवनाथ जांभुळकर, प्रदीप साखरे, भांबवडी गावचे सरपंच अमर बुदगुडे, संकेत धनावडे, जीवन साखरे, नवनाथ डाळ, रोहन भोसले, अविनाश भोसले, दीपक मालुसरे समीर घोडेकर, विजय तामकर, रामदास नांगरे, आप्पा मालुसरे, दत्तात्रय नवघणे व मान्यवर उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी भोर विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. त्यांना महिला, तरुण मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील जनता विकासाचा नवा पॅटर्न किरण दगडेंच्या रुपात शोधत असून जनतेचं भरभरून प्रेम व पाठिंबा त्यांना मिळत आहे. व्यासपीठावर सर्वसामान्य महिला येऊन त्यांचंबद्दल आशेचा किरण असे नम्रतेने म्हणत आहेत, हीच त्यांच्या कार्याची मोठी पोचपावती आहे. प्रचार शुभारंभ सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
माझ्यावर दबाव आणला तर दोन मतदारसंघात प्रभाव टाकणार यावेळी झालेल्या प्रचारसभेतील व्यासपीठावरून किरण दगडे पाटील म्हणाले की, मी माघार घ्यावी म्हणून माझ्यावर महायुतीकडून मोठा दबाव आणला जात आहे. पण मी देखील मागे हटणारा नसून त्यांना ठणकावून सांगितले आहे की, माझ्यावर दबाव आणला तर मीदेखील दोन मतदारसंघावर प्रभाव टाकू शकतो. मी निवडणुकीत केवळ जनतेसाठी, जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी उभा राहिलो आहे. रायरेश्वराचा विकास व तरुणांसाठी एमआयडीसी यासाठी उभा राहिलो आहे. लोकसभेत मी अजित पवार यांना बारामती लोकसभेसाठी मोठे सहकार्य केले. मात्र त्याची परतफेड म्हणून मला अपक्ष उभे रहावे लागत आहे.
माझ्यासाठी एकदिवस द्या, मी आयुष्यभर सोबत असेन शिक्षण घेऊन पण येथील तरुणांना हमाली करावी लागते, हे पाहून त्रास होतो, एवढं वर्ष यांची सत्ता होती यांनी काय केले. भोर भागात एमआयडीसी नाही, ती करायची आहे. या भागात विकास झाला नाही, तो करायचा आहे. हे दोन तालुके नसते तर आपल्याला राष्ट्र दिसले नसते. आपण कर देतो, त्याचा मोबदला नाही, एसटी नाही, दवाखाना-रुग्णवाहिका नाही, हे करता यावे यासाठी याठिकाणी आलो आहे. माझ्यासाठी एकदिवस द्या, मी आयुष्यभर सोबत असेन असे दगडे पाटील म्हणाले.
रायरेश्वराची जमीन परत द्या, हवं तर त्याबदल्यात दुसरी देऊ – थोपटेंना आवाहन तीर्थक्षेत्र रायरेश्वराचा विकास करायचा असून जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याचा कयास आहे. भले उद्या निवडणुकीत काहीही होवो, पण मंदिराचा जीर्णोद्धार करायचाच आहे. त्यामुळे येथील मंदिराची 11 एकर जागा थोपटे यांनी परत द्यावी, हवं तर त्याबदल्यात त्यांना दुसरीकडे 22 एकर जागा वर्गणी काढून घेऊन देऊ असे थेट आवाहन थोपटे यांना केले आहे.
मुलींच्या लग्नासाठी भोरमध्ये मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून देणार पुढील 5 वर्षात एमआयडीसी, हॉस्पिटल, रस्ता, रायरेश्वर क्षेत्राचा विकास असे सर्व सर्व प्रश्न मार्गी लावणार असून भोर येथील मुलींची लग्न मोफत झाली पाहिजे, यासाठी एक लग्न कार्यालय येथे बांधणार आहे, असे दगडे पाटील यांनी सांगितले.
अपक्ष उमेदवारासाठी एवढी गर्दी, ही पहिलीच वेळ – प्रवीण तरडे
किरण दगडे पाटील हा माणूस खरंच जिवाभावाचा असल्याने येथे प्रचारासाठी आलो. शेतकर्यांच्या जमिनी वाचाव्यात म्हणून चित्रपटासाठी जेव्हा मला कोणी दारात पण उभं केलं नाही तेव्हा सर्वात पहिले किरण माझ्यामागे उभा राहिला. शेतकर्यांच्या जमिनी त्यामुळे वाचल्या. 23 नोव्हेंबर 2018 ला मुळशी पॅटर्न चित्रपट दाखल झाला होता, आता 23 नोव्हेंबरला किरण दगडे पाटील पॅटर्न आमदार म्हणून सुपरहिट होणार आहे. मलाही अनेकजनांनी सांगितले की, दगडे यांच्या व्यासपीठावर जाऊ नये. पण मीही त्यांना ठासून सांगितले की, दगडे अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे मी कोणत्या एका पक्षाचं समर्थन नाही करत तर अपक्ष उमेदवाराचं समर्थन करत आहे. त्यांचं चिन्ह नवं असलं तरी महाराष्ट्रात सध्या बर्याच पक्षांचं चिन्ह नवीनच आहे. आणि अपक्ष उमेदवारासाठी झालेली एवढी गर्दी हे मात्र पहिल्यांदाच पाहिलं आहे. कारण त्यांनी कोणतंही सरकारी अनुदान नाही, तर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून काम केलं आहे. त्यामुळे किरण दगडे आमदार झाले तर जनतेचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी मी स्वतः जबाबदार असेल.