


वेळेत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला प्रतिदिन होणार 1 लाख दंड
सैराट कामामुळे मातीवरच डांबर टाकून रुंदीकरण
(संजय दुधाणे, संपादक)
महावार्ता न्यूज: अंबडवेट गावातील सैराट डांबरीकरणाची चर्चा मुळशीत रंगली आहे. युध्दपातळीवर होणारे रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण नेमके कोणासाठी व का सुरू याचे याचा स्थानिकांचा पत्ताच नाही. कोण म्हणतंय राष्ट्रपती येणार की पंतप्रधान , कोणाला वाटतयं रिंग रोडमुळे काम सुरू झाले आहे.
तुफानी वेगाने होणारे हे रुंदीकरण पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल शर्यतीसाठी होत आहे. जागतिक दर्जा असलेल्या या सायकल शर्यतीचे सुरुवात मुळशीतून होणार आहे. मुळशीसह, मावळ, पुरंदर, बारामती, राजगड व हवेली, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर भागातून ४३७ किमीचा पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेचा थरार १९ ते ३० जानेवारी दरम्यान रंगणार आहे.

मुळशीतून सायकल शर्यतीचा कसा आहे पल्ला
सायकल शर्यत मुळशीतील माण, अंबडवेट, पौड, चाले, कोळवण, हाडशी, जवण, त्रिकोणा पेठ मार्गे मावळ तालुक्यात जाईल. पुढे मावळमधून चांदखेड मार्गी कासारसाई, नेरे, मारूंजी, हिंजवडी येणार आहे.
सायकल शर्यतीचा पहिला टप्पा 91. 8 कि.मी असणार आहे. यापैकी 60 पेक्षा अधिक अंतर हे मुळशीतून असेल.हे सर्व अंतराचे युध्दपातळीवर डांबरीकरण सुरू झाले आहे.
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे शहर व जिल्ह्यातील ४३७ किलोमीटर रस्त्यांची कामे १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून, कामास विलंब झाल्यास संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन एक लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे. यामुळेच सैराट पद्धतीने काम मुळशीतून सुरू आहे. चक्क मातीवर डांबरीकरण करून रस्ता रुंदीकरण सुरू झाले आहे.

या शर्यतीमुळे पर्यटनास चालना मिळेल, स्थानिकांना रोजगार मिळेल, जागतिक पातळीवर पुण्यातील ग्रामिण भाग झळकेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केली आहे. मूळात या शर्यत बाबत मुळशीसह पुरंदर, बारामती, मावळ तालुक्यात कोणतीही जनजागृती अद्याप झाली नाही. शर्यतीला इव्हेंट होत असल्याने लोक सहभागाची कोणतीही योजना मुख्य संयोजक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाही. यामुळेच ही सायकल शर्यत ग्रामिण भागात केवळ डांबरीकरण पुरतीच मर्यादित राहिल असे सध्यातरी चित्र आहे.















