मुळशीत हवा कोणाची ? तुतारी की घड्याळ, नोटा की नो वोट – बारामती लोकसभा मतदारसंघ, महावार्ता गाऊंड झिरो रिपोर्ट 1

प्रा.संजय दुधाणे, संपादक महावार्ता
महाविकास आघाडीचा महिला मेळावा, मंगळवार 30 एप्रिल, 2024, स्थळ ः निशिगंधा लॉन्स, शेळकेवाडी फाटा
रणरणत्या उन्हात माजी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू होता. मुळशीतील दोन जिल्हा परिषद गटाच्या सभा करून हिंजवडी-माण गटाची सभा व महिला मेळावा घोटावडयातील निशिगंधी लॉन्समध्ये सुरू झाला होता. व्यासपीठावर उमेदवार सुप्रिया सुळेंसह आमदार संग्राम थोपटेसह मुळशीतील दोन माजी खासदार उपस्थित होते. खुर्चीवर एक पाय वर करून बसलेले नाना नवले व त्यांच्यामागे सोप्यावर बसलेले अशोक मोहोळ. माझ्यासह अनेक मुळशीकरांच्या मनी एक सवाल डोकावून गेला. एकेकाळी खासदार मुळशीचा असायचा आणि आमदारच्या मुळशीचा निवडून यायचा. आता सारं गणितच बदलून गेले.

घोटावड्यातील सभेत नाना नवले, अशोक मोहोळ यांची भाषणे झाली. भाषणात दम नव्हता. ेसमोर असलेल्या अनेकांना जुने दिवस आठवलं. गोधडी बैठका घेऊन, पौडमध्ये भेळ पार्टी करून नाना नवले, अशोक मोहोळ सहजपणे निवडून गेले. गेल्या 12-15 वर्षांत सारं काही बदलून गेले होते. आधी मुळशीची खासदारकी गेली, पाठोपाठ आमदारही कधी गेली हेदेखिल उमजून आले नाही. खेड लोकसभा मतदारसंघाचे बारामतींत रूपांतर होताच सुप्रिया सुळे पर्व उदयास आले. सुळेंच्या नावाला कोणीच विरोध केला नाही. मूळात कोणात हिंमतच नव्हती. सुप्रियाताईंची पहाता – पहाता खासदारकीची हॅटट्रिक झाली. या 12 वर्षात मुळशीच्या पदरी काय आले. ना कोलाड महामार्गामुळे मुळशीची प्रगती झाली, ना चांदणी चौकामुळे मुळशीचे स्टार बदलले. 4 जी, 5 जीच्या आपण गप्पा मारतो, 30 एप्रिलला ज्या निशिगंधा लॉन्समध्ये सुप्रियाताईंची सभा होती, तेथेच पत्रकारांना लाईव्ह करण्यासाठी नेटवर्क नव्हते, निशिगंधाच्या हाकेच्या अंतरावर हिंजवडी आय टी पार्क आहेत. या आय टी पार्कमध्ये किती मुळशीकर अभियंता आहेत याचा हा यक्षप्रश्न आहे.

आता कोणाला मत दयायचे…..शरद पवार साहेबांना की अजित दादा पवारांना ….मुळशीकरांच्या मनी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. वडिलधारी मंडळी तुतारीच निवडून येणार असे सांगत असताना आणि त्याची मुले घड्याळाचा प्रचार करताना दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणूकीने पवारांचे घरचे फोटले नाही तर प्रचारात गावात दोन गट निर्माण झाल्यात, घराघरात दोन मते प्रवाह वाहू लागले आहेत.

बारामतीत कोणाची हवा वाहतेय हे सांगणे कठिण आहे. निष्ठावंत गट तुतारीचा मागे ठाम उभा राहिलेला दिसतोय. घड्याळ्याची टिक टिक मुळशीतील पूर्व भागात ऐकू येत असली तरी तुतारीची ललकारही घुमत आहे. घोडावड्यातील शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर शिवसैनिक सज्ज झाले आहेत. तुतारी घुमत असली तरी विकास सोसायट्या, दूध संघातच्या कार्यलयात घड्याळ झळकत आहे. कार्यालयात, हातात घड्याळ असले तरी राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी हा मंत्र जपणारेही मुळशीकर निवडणूकीतचे गेमचेंजर ठरू शकतात.
क्रमशः
See also  आवाज कोणाचा आस्मि विचारमंचाचा….नवे अध्यक्ष अ‍ॅड. खामकरांचे अ‍ॅड. रवि शिंदेेंकडून कौतुक