पौड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, चोरलेले तब्बल 3 लाखांचे 25 मोबाईल केले परत

महावार्ता न्यूज:मुळशी तालुक्यातील विविध ठिकाणाहून हरवलेल्या मोबाईलचा पौड पोलिसांनी तांत्रिक कौशल्याने शोध घेत सुमारे तीन लाख रूपयांचे 25 मोबाईल मूळ मालकांना परत केले आहे. या कामगिरीबद्दल पौड पोलीसांचे कौतुक होत आहे.
उत्तर प्रदेश, औरंगाबाद, कोकणातून हे मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले. सहा महिन्यापूर्वी हरविलेला आणि मिळण्याची अपेक्षाही सोडून दिलेल्या मुळशीकरांना त्यांचे महागडे मोबाईल परत देवून पौड पोलिसांनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

तालुक्यातील विविध ठिकाणांहून युवकांचे विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल हरविले होते. त्याबाबत त्यांनी पौड पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली होती. तालुक्यातील सायबर विभागाचे सर्व कामकाज पाहणारे पोलिस नाईक सिद्धेश पाटील यांनी मोबाईल हॅण्डसेटमधील आयएमईआय नंबरच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. त्यावेळी हे मोबाईल उत्तर प्रदेश, औरंगाबाद, कोकण, पुणे या भागात आढळले.
ज्यांच्याकडे ते मोबाईल होते त्यातील काहींना समजतूची तर काहींनी पोलिसी हिसक्याच्या भाषेत समजावल्यानंतर ज्यांच्याकडे ते मोबाईल होते त्यानी खास कुरीयर करून मोबाईल पौड पोलिसांकडे पाठविले. पाटील यांनी मोबाईलच्या मूळ मालकांना मोबाईल सापडल्याचे सांगितले. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी सिद्धेश पाटील, पोलिस शिपाई नवनाथ शिंदे, पोलिस नाईक सुनिल कोळी, पोलिस कॉन्स्टेबल चेतन पाटील आदी उपस्थित होते.
सहा, सात महिन्यापूर्वी हरविलेल्या मोबाईलचा कुणी दूरूपयोग करू नये म्हणून त्याची पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याची परत मिळण्याची अपेक्षा मुळशीकरांनी सोडली होती. परंतू पोलिसांनी अचानक मोबाईल सापडल्याची बातमी देऊन त्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. पोलिस ठाण्यात तो परत घेताना मूळ मालकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. प्रत्येकाने पौड पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले.
See also  गावठी पिस्तूल बाळगल्याने मुळशीत एक जण अटक, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई