


सुव्यवस्था की अव्यवस्था ?
जसे अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाची मुलभूत गरज आहे तसेच सामाजिक स्तरांवरही अनेक सुविधांची गरज भासते. आजच्या धावत्या युगांत वेळ वाचवण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनाचा प्रचंड उपयोग होत आहे. विशेषत: घरापर्यंत येऊन त्यांच्या समस्या सांगणारे दुग्ध व्यावसायिक असो किंवा रिक्षाचालक आणि सामान्य नागरीक रस्त्यांच्या बदलत चाललेल्या स्वरूपाला तोंड देत आहेत. दैनिक संघर्ष सुरूच आहे, रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला वर्षानुवर्षे लागतात, तोपर्यंत जनसामान्यांच्या हाडांची चाळणच बनून जाते. रस्ता रुंदीकरण आणि तो सुस्थितीत आणणे हे चांगलेच काम आहे, पण ते पूर्ण झाल्यावर गतीरोधकाची ठिकठिकाणी आवश्यकता आहे तसेच गतीरोधक दुरून लक्षांत यावा यांसाठी त्याला रंगरंगोटीचीही गरज आहेच. रोज बेसुमार अपघात घडत असतात, कुणाच्याही कुटुंबाचा आधार कधीही यांत बळी पडू शकतो.
उड्डाणपूल, भुयारीमार्ग, हे सगळंच मोठ्या शहरांची गरज आहे. पण अगदी लहान लहान जिल्ह्यातही ही सर्व कामे सध्या चालू आहेत. सुविधेत प्रगती जरूर असावी, पण त्यालाही गतिरोधक असेल तर परिस्थिती नियंत्रित राहण्यास मदत होईल. लेखिका म्हणून संवाद साधताना सर्वानुमते अपेक्षित भावना सामोरी आली, मिळणाऱ्या प्रतिक्रियेतून आग्रहास्तव लेखनांतून सामोरी आली. ग्रामीण भागांतून येणाऱ्या जनतेला जिल्ह्याचे ठिकाण ओळखु येत नाही. बोलक्या अभिप्रायांकडे आपोआप लक्ष वेधले जाते. “पावसाने दिलेल्या ओढीने आणि भविष्यातील चिंतेने प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आले आहे.” अपघात झाल्यावरही हॉस्पिटलचा खर्च सर्वांनाच परवडेल असे नाही. रोजंदारीवर काम करणारी माणसे असू द्यात, कामगारवर्ग यांची अवस्था अधिक बिकट आहे.
“काम दिसले पाहिजे” हे जरी सत्य असले तरी त्याची पूर्तता योग्य रीतीने होणे किंवा झालंय की नाही यांकडे लक्ष देणे महत्वाचे असते. महामार्ग हा प्रवासाचा वेळ वाचवणारा असला तरी, जीवघेणा ठरू नये. काही प्रदेशांत/प्रांतात कधी सरळ तर कधी नागमोडी उंचसखल असे रस्ते ज्यांचा अंदाजच चालकाला येत नाही. गाडीवरचे नियंत्रण सुटले की मग तोही गडबडतो. कुठूनतरी पोट भरण्यासाठी हे लोक येत असतात. खरे तर चालक म्हणून परवाना देताना त्यांचे वय विचारांत घेण्यांत यावे ही माफक अपेक्षा आहे, कारण जे अपघात होतात त्यांत तरूणांचे प्रमाण जास्त आहे. मध्यरात्री, पहाटे डोळ्यांत झोप मावत नसते, काही वेळेला चालक व्यसनाधीन असतात. अपघाताची कारणे अनेक असली तरी गाडीचे, मालाचे आणि व्यक्तीच्या आयुष्याचे नुकसान न भरून निघणारे असते. कुटुंबाची गरज म्हणून बहुतांशी वेळेस मिळेल ते काम करत रहाण्याची मानसिकता वाढली आहे.
शाळकरी मुले तसेच वयोवृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडताना भयभीत होऊ लागलेत. उन्हांपावसांत उभे राहून एस.टी.ची वाट पहाताना आडोसा किंवा पत्र्याचे साधे शेडही नसते. महामार्गावर दहा-बारा, पंधरा–सोळा तास प्रवास करत असताना एखादे चहाचे ठिकाण किंवा पिण्याचे पाणीही न मिळणे हे किती भूषणावह आहे याची जाणीव आता सर्वांनाच होऊ लागली आहे. आता इतकेच म्हणावेसे वाटते, “उष:काल होताना कोणत्यातरी कुटुंबासाठी ती अपघातग्रस्त काळरात्र ठरू नये, आणि तसेच रस्त्यांच्या कामांला सलाम करताना गतिरोधकाला पूर्णविराम देऊन चालणार नाही.”
© मेघनुश्री [लेखिका,पत्र














