38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात टीम महाराष्टाचे राजेशाही फेटयात दिमाखदार संचलन
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मंगळवारी महाराष्ट्राच्या २० खेळाडू, संघटकांसह शानदार संचलन केले. राजेशाही फेटा परिधान करीत महाराष्ट्राच्या पथकाचे लक्षवेधी संचलन झाले.
जागतिक पदक विजेती महिला तिरंदाज आदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकविला.
संचलनात १५ खेळांडूसह पथकप्रमुख संजय शेटे, उपपथकप्रमुख उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे, स्मिता शिरोळे व खजिनदार धनंजय भोसले सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी आहेत. गतवर्षीच्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
गतविजेत्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रायथलॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करीत आम्हाला ‘नंबर वन’ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले. महिला ट्रायथलॉनमध्ये डॉली पाटील हिने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर मानसी मोहिते हिने रौप्य पदकाची कमाई केली. ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले.
महाराष्ट्राने सेनादलाची तब्बल 16 वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून गोवा येथे 2023मध्ये झालेल्या मागील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकतक्त्यात अव्वल स्थान काबीज केले. महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 67 रौप्य व 79 कांस्य अशी एकूण 228 पदकांची लयलूट करीत ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.
सर्व छायाचित्रे – महेंद्र कोल्हे