फेसबुकवरील काँग्रेसचे चिन्ह हटवले , विचार नितीचा ही टँगलाईन
पौड ः माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजपा प्रवेशाची औपचारिकता बाकी असताना मुळशीतील भाजप गटातच कही खुश, कही गमचे नाट्य पहाण्यास मिळाले. मात्र थोपटे यांच्या प्रवेशामुळे मुळशीत भाजपाला नवसंजीवनी लाभणार असे चित्र आहे. सोमवारी संग्राम थोपटे यांची फेसबुकवरील काँग्रेसचे चिन्ह हटवले असून विचार नितीचा ही टँगलाईन झळकवली आहे.
मुळशीतील तुफानी मतदानामुळे भोर-मुळशी-वेल्हा मतदार संघात संग्राम थोपटे यांना चीत करून शंकर मांडेकर बाजीगर ठरले. तेव्हापासूनच संग्राम थोपटेंच्या भाजपा प्रवेशाची कुजबुज सुरू होती. अखेर कुजबुज खरी ठरली. राजगड साखर कारखान्याला कर्ज मिळत नसल्याने प्रथमदर्शनी थोपटेंसमोर भाजपात प्रवेश करणे हाच पर्याय होता अशी चर्चा भोर शहरात दिवसभर सुरू होती. सर्वांगिण विकासासाठी भाजपात जात आहे असे थोपटे यांनी जाहिर केले असले तरी राजकीय पुर्नवसनासाठी भाजप प्रवेश हा राजामार्ग दादांच्या समोर होता असे त्यांच पाठेराखे सांगत आहे.
संग्राम थोपटे यांच्या भाजपा प्रवेशाच्या मोहिमेत केवळ भोरच नाही तर वेल्हा, मुळशीने समर्थ साथ दिली आहे. मुळशी तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवाजी जांभुळकर,दादाराम मांडेकर, शिवाजी बुचडे, महिला अध्यक्षा निकिताताई सणस, सुहास भोते, राहुल जाधव यांच्यासह जवळजवळ 90 टक्के काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जय भाजपाचा नारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. निवडणुकीचा अर्ज भरताना जसे शक्ती प्रदर्शन केले तसेच जोरदार शक्तीप्रदर्शन करीत संग्राम थोपटे भाजपावासी होणार आहे.
संग्राम थोपटे यांचा भाजपा प्रवेश हिंजवडी, माण पट्टयातील काही भाजपा कार्यकर्त्यांना अजून रूचला नाही. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते या शब्दात आपल्या भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रत्यक्षात मूळ भाजपातील अनेकांनी संग्राम थोपटे यांचे स्वागत केले आहे. या राजकीय घडामोडीमुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीत कमळ फुलण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजीत पवार गटाला याचा थेट फायदा होणार असल्याने दस्तुरखुद अजीत पवार यांनीही थोपटेंचे स्वागत करण्यास आडकाठी आणली नाही. मुळशीत आता पारंपारिक काँग्रेस पक्षला घरघर लागून भाजपाला नवे बळ लाभणार आहे. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी पवार गटाची ताकद निवडणुकीत नवी समीकरणे घडविणार आहेत. अजून बरचं काही घडणार-बिघाडणार आहे.