महावार्ता न्युज ( संपादक- प्रा. संजय दुधाणे ) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आज आरक्षण सोडती निश्चित होणार आहे. मुळशीत 3 गट व पंचायत समितीसाठी 6 गणाच्या सोडतीकडे सार्या तालुक्याचे लक्ष असणार आहे. मुळशीत भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदी कोण भाग्यवान ठरणार याची चर्चा रंगली आहे.
मुळशी तालुका पंचायत समितीसाठी सहा गण आहेत. यामध्ये पौड, अंबडवेट, पिरंगुट, भुगांव, माण आणि हिंजवडी या गणांचा समावेश आहे. या गटाच्या सोडतील पौड येथील पंचायत समितीच्या सभागृहात 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता निघतील. याच वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा परिषदेच्या सोडती जाहिर होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुणे जिल्हा परिषद (ZP) आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या (PS) सदस्य पदांसाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदांकरिता आरक्षण सोडत निघतील.
मुळशी पंचायत समितीच्या सहा गणासाठी तसेच जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी आरक्षण सोडत होईल. तयारी केलेले इच्छुक मनाप्रमाणे आरक्षण पडले तर लढतील व गट गण महिलांसाठी राखीव झाला तर पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची चिन्हे आहेत.
विधानसभेला आमदार शंकर मांडेकर हे निवडून आले. त्यांना मुळशी तालुक्यात जवळजवळ ९० हजार मतदान झाले. त्यामुळे मुळशी तालुक्यात आमदार मांडेकर यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडून येण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. अजीत पवार गटाकडून तिकिट मिळाले नाही तर शरद पवार गटाचे दरवाजे खुले असणार आहे.
मुळशीत पौड-अंबडवेट सर्वाधिक इच्छुकाची गर्दी झाली आहे. मिलिंद वाळुंज, बाबा कंधारे, अमित कंधारे, अविनाश बलकवडे हे प्रबळ दावेदार आहेत.
पिरंगुट- भुगांव गटात शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, निकिता सणस यांच्या नावाची चर्चा आहे.
माण – हिंजवडी गटात तानाजी हुलावळे, बाबाजी शेळके, गणेश जांभुळकर, प्रकाश भेगडे, गंगाराम मातेरे, नंदू भोईर, माजी सभापती पांडुरंग ओझरकर,सुरेश हुलावळे, साखर साखरे, शिवाजी बुचडे यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) आणि त्यामधील स्त्रियांसाठी तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. आरक्षण चक्रानुक्रमाची (Rotation) पद्धत आणि कायद्यातील नवीन तरतुदीनुसार ही सोडत घेतली जात असल्यामुळे, या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि स्थानिक नेत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.