महावार्ता न्यूज: मुळशीत अपेक्षेनुसार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. 19 ग्रामपंचायत निवडणुकीत 10 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरपंच विराजमान झाले आहेत, तर 6 ग्रामपंचायत काॅग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर शिवसेनेलाही यश मिळाले आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराचा उडत असताना मुळशीतही सरपंच पदासाठी चुरस पहाण्यास मिळाली. 23 गावाच्या निवडणुकीत 4 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 19 गावात रणधुमाळी दिसून आली.
मुळशीत आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद या निवडणुकीत दिसुन आली. हा विजय येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी बळ देणारा असल्याचे मुळशी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे यांनी सांगितले.
आमदार संग्राम थोपटे यांच्या विकास कामांमुळे काॅग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत षटकार झळकविला आहे. यामुळेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचीही विजयी घोडदौड असेल असा विश्वास काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी व्यक्त केला आहे.