पिरंगुटमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तीचा जागर, उद्या दुर्गामाता दौड, वाचा श्री तुळजाभवानी देवस्थानचा इतिहास फक्त महावार्तावर 

महावार्ता विशेष / संपादक – संजय दुधाणे
मुळशीतील पिरंगुटमधील शिवकालीन तुळजा भवानी माता मंदिर गेली आठ दिवस भक्तीचा जागर सुरू आहे. मंदिराला केलेली आकर्षक रोषणाई व आरती हजारो भाविकांनी पाऊले मंदिराच्या दिशेने पडत आहे.
 रविवारी 23 ऑक्टोंबरला दुर्गामाता दौडचे नियोजन करण्यात आले आहे. सलग सातव्या वर्षी निघणारय या दौडला मुळशीकरांनी मोठा प्रतिसाद देण्याचा निर्धार केला आहे. पांढरा सदरा, वारकरी टोपी परिधान करून निघणार्‍या या दौडचे महाराष्ट्राभर कौतुक होत असते. 
शिवकालीन श्री तुळजाभवानी देवस्थान
दर्‍याखोर्‍यातील निसर्गसंपन्न मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावाच्या टेकडीवरील तुळजा भवानी माता मंदिर हे वैभव बनले आहे. केवळ मुळशीचे नव्हे तर पुणेकरांचे श्रध्दास्थान, शक्तीपीठ असणार्‍या भवानी माता मंदिरात मोठ्या भक्तीभावाने नवरात्र महोत्सव साजरा होत असतो. यंदा कोरोनामुळे साधेपणाने उत्सव साजरा होणार आहे.
शिवछत्रपतींचे दैवत असणार्‍या आई जगदंबा तुळजाभवानीची आराधना पिरंगुटच्या देवालयात शिवकाळापासून होत आहे. पिरंगुटच्या टेकडीवरील माता तुळजाभवानीचे मंदिर हे देखील शिवकालीन आहे. पिरंगुट गावठाणातील पेशवेकालीन गणेशमंदिर आणि डोंगरमाथ्यावरील भवानी मातेचे मंदिर हे महाराष्ट्रातील पुरातन मंदिरे आहेत. शिवकाळात गनिमाविरूध्द झुंज देताना भवानी मातेच्या परिसरात एके दिवशी युध्द झाल्याची आख्यायिका प्रसिध्द आहे. शिवरायांचा एकनिष्ठ  सरदार बाजी पासलकर यांनी शत्रूला पिरंगुटच्या माळरानावरून पळून लावले होते. शिवकाळात युध्द जिंकल्यानंतर पवित्र रणभूमीत कुलस्वामीनी आई तुळजाभवानीची प्राणप्रतिष्ठा केली जायची. यानुसार पिरंगुट येथील टेकडीवर मावळ्यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर बांधले. पिरंगुट पंचक्रोशीतील लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मंदिरात पुजाअर्चा करीत असे. 

स्वातंत्र्यानंतर पिरंगुटच्या पवळे घराण्यातील देवीभक्त गंगुबाई एकनाथ पवळे यांनी चैत्रपौर्णिमा व घटस्थापनेची परंपरा भवानी मंदिरात सुरू केली. पवित्र कुळातील गंगुबाईंनी देवी बरोबर भाविकांचीही सेवा केली. आपले सारे जीवनच या मातेने तुळजा भवानीच्या चरणी अर्पित केले. गेली सहा दशके ही गौरवशाली परंपरा भाविकांना प्रेरणा देत आहे. 
आई जगदंबेच्या सेवेतच गंगूबाई पवळे स्वर्गवासी झाल्यानंतर पिंरगुट व परिसरातील  भक्त आता भव्य स्वरूपात नवरात्र महोत्सव साजरा करीत आहेत. अनेक सेवाभावी तरूणांनी या मंदिराचा परिसर चैतन्यदायी बनविला आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने सार्‍या भक्तांचे जीवन समृध्द होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून संपूर्ण महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. भवानीमाता टेकडीवर प्राचीन काळापासून पौर्णिमेचा सण सारे पिरंगुट गाव व पंचक्रोशी साजरे करीत आहे. 

https://www.facebook.com/100007379228255/videos/699908071804389/

See also  बारामती तुपाशी अन् मुळशी उपाशी? मुळशीकरांचे ठरले उमेदवारांना नो वोट, ओन्ली नोटा
हिंदू नववर्ष सुरु झाल्यानंतर 15 दिवसांनी गावातील भैरवनाथ मंदिरात एक उंच काठी भगव्या वस्त्राने सजविली जाते. त्यावर शिवकालीन ध्वज फडकवला जातो. भैरवनाथ मंदिरापासून वाजत गाजत ही काठी भवानी टेकडीवर नेण्यात येते. काठी हाती येणे व फिरवणे ही भाग्याची गोष्ट समजली जाते. 
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी टेकडीवर जत्राच भरलेली असते. या दिवशी नवसाचे बगाड पुजन होते. व आई भवानी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या नुसार नवसाचे बगाड पुजन म्हणून कै. श्रीपती गोपाळा नवाळे यांची पिढी गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव करत असते. हा बगाड फिरण्याचा व नवासाच्या काठीचा कायर्र्क्रम दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडत असतो. 
लेखन – संजय दुधाणे