


महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल ग्रुप ऑफ इइन्स्टिटयूट्समचा हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्ताचे औचित्य साधून घोटावडे फाटा येथे नवीन शाळेचे वास्तूत भूमिपूजन व पायाभरणी समारंभ ह. भ. प पंकज महाराज गावडे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. पेरिविंकल च्या बावधन, सुस, पिरंगुट, पौड, माले, कोळवण अशा 6 शाखांच्या यशस्वी विस्तारा नंतर घोटावडे येथील 7 व्या शाखेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करून विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल सिद्ध केली.

कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे भाषाप्रभू व अध्यात्मिक गुरु ह. भ. प. मा. श्री पंकज महाराज गावडे यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी मायात गावडे, उद्योगपती अजित करंदीकर,आश्विनी करंदीकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, सौ रेखा बांदल यांच्या समवेत सर्व शाखांचे प्राचार्य तसेच गटनेते शांताराम इंगवले, संदीप ढमढेरे, यश बांदल, ज्ञानेश्वर पवळे, उद्योगपती सुधांशू शर्मा, वरिष्ठ पोलीस अधिकारी छबुराव बेरड, संजय पन्हाळकर, सौ स्नेहा साठे, आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळशी तालुक्यात पेरिविंकल शाळेच्या शाखा बावधन, सूस, पिरंगुट, पौड, कोळवण, माले व आता घोटावडे येथे नवीन शाखेचा शुभारंभ करून पेरिविंकल ची जणू सप्तपदीच पूर्ण झाली आहे . लवकरच या पेरिविंकल रुपी वटवृक्षाचे मोठ्या विद्यापीठा मध्ये रुपांतर होईल अशी जिद्द प्रत्येकाच्या मनात आहे.

अयोध्या येथील रामलल्ला च्या गर्भगृहात प्रथम कीर्तन करण्याचा मान पटकवणारे कीर्तनकार, अध्यात्मिक गुरु, भाषाप्रभू ह.भ. प. श्री.पंकज महाराज गावडे यांच्या कीर्तनाने घोटावडे येथील भूमी पावन झाली .यावेळी महाराजांनी आपल्या कीर्तनातून जनजागृती केली व शिक्षकांनी मुलांना जगणं शिकवावं तसेच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करावा. केवळ सिलॅब्स शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे तर एक आदर्श नागरिक घडवणारा खरा शिक्षक. शिक्षक हा नेहमीच श्रेष्ठ असून अणूपासून ब्रम्हांडा एवढी प्रगती करताना शिक्षकांनी पदचिन्हे उमटवावी असे मत पंकज महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षकांना अर्जुनाची उपमा देऊन शिक्षकांना प्रोत्साहित केले .सर्वांनी जीवनाच्या या शाळेत श्रीकृष्ण होऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा संदेश पंकज महाराज गावडे यांनी सर्वांना दिला.















