


महावार्ता न्यूज ः दिवाळीनंतर भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात कोणाच्या विजयाचे फटाके फुटणार हे सांगणे कठिण झाले आहे. तब्बल 15 जणांचे अर्ज वैध ठरले असून 3 अपक्ष उमेदवरांमुळे महायुतीत धाकधुक वाढली असताना काँग्रेसमध्येही अचानकपणे धकधक ऐकू येऊ लागली आहे.
203 भोर विधानसभेचे बाजीगर कोण हे सांगण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सांगण्यास ज्योतिषाची गरज नव्हती. उमेदवारी अर्ज भरवण्याच्या आधीच्या रात्री सारं चित्रच बदलून गेले. उबाठा गटातील शंकर मांडेकर यांना चांदणी चौकात एबी फार्म रात्री देण्यात आला आणि मुळशीच्या प्रवेशव्दार असणार्या चांदणी चौकतच जणू काँग्रेससाठी तटबंदी बांधली गेली. मशाल हाती घेऊन धनुष्याला मागे टाकत रात्रीत मांडेकर यांनी घड्याळ घातल्याची चर्चा अजूनही रंगली आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून शंकर मांडेकर यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरला तरी भाजप, शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. या 3 तिघांची समजूत कशी काढायची, त्यांना काय आश्वासने द्यायची हे अजून तरी निश्चित न झाल्याने माघारीच्या वाटाघाटी सुरूच आहे. यामुळे राष्ट्रवादी अजीत पवार गटात मोठी धाकधुक आहे. त्यात निष्ठावंताना डावलून उमेदवारी दिल्याने नाराजीची सूर अजून कमी झाला नाही. शिंदे गटाने ना खडकवासला ना भोर मतदारसंघ कोंडे यांना न दिल्याने भोरची मते मुळशीतील उमेदवरांला कितपत मिळणार हा प्रश्न आहेच.














