पिरंगुट: विधानसभेत मतदान कोणाला हा प्रश्न विचारताच मुळशीत एकच उत्तर मिळते – ना घड्याळाला, ना पंजाला, औंदा मत किरण दगडेंच्या किटलीला.
मुळशी तालुक्यात दगडे यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. लोकांनी दगडे यांना त्यांच्या कार्यशैलीवर खुश होत पाठिंबा दर्शवला. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय, मला तिन्ही तालुक्यात चांगलं काम करायचं आहे, असे मत भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी भरे, ता.मुळशी येथे व्यक्त केले. काशियात्रा हे लोकांशी संपर्काचं एक निमित्त होतं. लोकांना त्यामुळे कार्यपरीचय करून देता आला. भोर, राजगड, मुळशीत यापूर्वी न झालेल्या गोष्टी आणि लोकांना सुखकारक रीतीने आयुष्य जगता यावं अशा सुविधा निर्माण करणार असल्याचं दगडे यांनी सांगितले. मतदारसंघात एकही धड क्रीडासंकुल नाहीये, महिला बचत गटांना हॉल नाही, एसटी नाही, बस नाही, गार्डन नाही. पुण्यात जागा कमी असली तरी गार्डन होतंय, क्रीडा संकुल होतंय. मग जे पुण्यात होऊ शकतं ते भोर मतदारसंघात का होत नाहीये. निधी व विकासकाम आणण्यासाठी लोकप्रतिनिधिंनी फक्त लिहून द्यायचे असते, खिशातून पैसे घालवायचे नसतात. तरीही लोकप्रतिनिधी करत नाहीत, त्यामुळे येथे सोयीसुविधा होत नाहीत. मोठ्या लोकांच्या संस्थांना गायरान जागा मिळते, मग सार्वजनिक कामाला का नाही मिळत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मुळशी तर बरा, पण भोर-वेल्ह्यामध्ये गेलं की वाटतं, आपण कुठे आलो, इतकी बिकट अवस्था आहे. ज्याच्या साक्षीनं छत्रपती स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर मंदिराची दुरावस्था झाली आहे, मंदिराला धड पत्रे नाहीत, रस्ता नाही. उद्याच्या निवडणुकीत काही होवो, मला मात्र या गोष्टी करायच्याच आहेत. भोर तालुक्यात लोकं वैतागली आहेत, त्यामुळे भोरमध्ये प्रचंड पाठिंबा मिळत असून मुळशीने साथ द्यावी. माझ्यावर मोठा दबाव आणला, काय पाहिजे ते सांग म्हटले, पण मी दबावाला न जुमानता जनतेसाठी निवडणूकीत उभा राहिलो आहे. त्यासाठी सामान्य जनतेची साथ मला मोलाची आहे.